रावेर । सध्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी दिसून येत आहे. गाडीत बसायला तर सोडा उभे राहायलाही जागा मिळत नसल्याने अनेकांना गेटवर लटकून प्रवास करावा लागतोय. मात्र याच दरम्यान, वाराणसी जंक्शन ते लोकमान्य टिळक टर्मिनसला जाणाऱ्या कामायनी एक्स्प्रेसमधून पडून दोन तरुणाचा मृत्यू झाला. ही रावेर रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे बोगद्याजवळ घडली. मोनू मंडल व आकाश वैद्य (दोन्ही रा.खंडवा) अशी मयतांची नावे आहेत तर दोघे संगीत पथकात वादक असल्याची माहिती आहे.
तोल गेला अन जिवाला मुकले
मोनू मंडल व आकाश वैद्य हे खंडवा येथून कामायनी एक्स्प्रेसने भुसावळ येथे एका लग्न समारंभासाठी येत होते मात्र कामायनीला प्रचंड गर्दी असल्याने दोघे तरुण दरवाजात उभे होते मात्र रेल्वे बोगद्याजवळ दोघांचा तोल गेल्यानंतर ते खाली पडले व डोक्याला मार लागल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसर्या तरुणाला गंभीर जखमी अवस्थेत हरीद्वार एक्स्प्रेसने भुसावळ ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
Discussion about this post