जळगाव । अमळनेर तालुक्यात वेगवेगळ्या तीन घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ढेकू येथे विषारी द्रव्य प्राशन केलेल्या ४१ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर पाडसे ते नरडाणा रेल्वेमार्गावर घडलेल्या दोन स्वतंत्र घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला. या घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली असून, याप्रकरणी अमळनेर आणि मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ढेकू येथील प्रताप देविदास महिराळे (वय ४१) यांना कुटुंबीयांनी उपचारासाठी धुळे येथील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले होते. वैद्यकीय तपासणीत त्यांनी विषारी द्रव्य प्राशन केल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, पाडसे ते नरडाणा रेल्वेमार्गावर दोन स्वतंत्र घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला. जातोडे येथील रहिवासी शशिकांत राजेंद्र राजपूत यांचा रेल्वेतून पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
तिसऱ्या घटनेत बोदर्डे येथील रामदास पारसिंग भिल्ल (वय ३३) यांचा पाडसे ते नरडाणा दरम्यान मृत्यू झाला. या दोन्ही रेल्वे अपघातांतील मृत्यूंची नेमकी परिस्थिती याबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही.
या तिन्ही घटनांप्रकरणी संबंधित पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील कार्यवाही सुरू आहे.














Discussion about this post