धुळ्याच्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे लग्नसमारंभादरम्यान घडलेल्या हिंसक घटनेने आनंदावर विरजण पडले आहे. हळदीच्या कार्यक्रमात झालेल्या तुंबळ हाणामारीत नवरीकडील तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण धुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, गोसावी समाजाचा विवाह सोहळा सुरू असताना हळदीच्या कार्यक्रमादरम्यान नवरदेव व नवरीकडील पाहुण्यांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. काही वेळातच या वादाने उग्र स्वरूप धारण केले. नवरदेवाच्या बाजूकडील काही तरुणांनी नवरीकडील मंडळींवर हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. यात गंभीर जखमी झालेल्या तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सुरेश सुपडुगिर गोसावी (रा. साक्री),साहील सुरेशगिर गोसावी (रा. साक्री) आणि देवा रवींद्र पवार (रा. साक्री) यांचा यात मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी धुळे येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
लग्नासारख्या मंगल प्रसंगी घडलेल्या या घटनेबाबत संताप व्यक्त होत आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.















Discussion about this post