धुळे । नंदुरबार-धुळे बसमध्ये दोन महिलांनी चोरी करण्याचा प्लॅन आखला होता. मात्र, तरुणाच्या सतर्कतेमुळे बसमधील 4 लाखांची चोरी उघड झाली आहे. या प्रकरणी पद्मा राहुल शेट्टी (20, रा. चिखलठाणा, छत्रपती संभाजीनगर) व अक्षया राजन शेट्टी (20, रा. चिखलठाणा, छत्रपती संभाजीनगर) या दोघा चोरट्या महिलांना पोलिसांनी अटक केली असून रोकडही जप्त केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिवाजी पाटील हे दोंडाईचा येथून धुळे येथे येण्यासाठी नंदुरबार-धुळे बसमध्ये प्रवास करत होते. यावेळी सोनगीर येथून दोन महिला बसमध्ये चढल्या. त्यातील एक महिला शिवाजी पाटील यांच्या शेजारी बसली. तिने नगाव चौफुली (देवपूर, धुळे) येथे पाटील यांच्या बॅगेची चैन उघडून त्यातील 4 लाख 9 हजार 500 रुपये काढून दुसर्या महिलेने दिलेल्या बॅगेत ठेवले.
ही बाब बसमध्ये असलेल्या मोहित समाधान पाटील याच्या लक्षात येताच त्याने आरडाओरडा केली. तसेच बस थेट देवपूर पोलीस ठाण्यात आणली. त्यानंतर महिला पोलीस कर्मचार्यांनी संशयित महिलांची व त्यांच्या बॅगची झडती घेतली असता संपूर्ण रक्कम मिळून आली. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही महिलांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.















Discussion about this post