पुणे । राज्यात सध्या उन्हाचा पारा ४० अंशावर पोहोचला आहे. यामुळे सकाळपासूनच उन्हाच्या झळा जाणवत आहे. एप्रिल महिन्यात तापमान ४५ अंशांवर जाते. अशातच वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शाळांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षा सकाळच्याच सत्रात घ्याव्या असे स्पष्ट निर्देश राज्य सरकारने शाळांना दिले आहेत. इयत्ता पहिली ते नववीच्या शालांत परीक्षांना येत्या काही दिवसांतच सुरुवात होणार असून, त्याच अनुषंगाने विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेत राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
राज्याच्या बहुतांश भागांमध्ये येणाऱ्या उष्णतेच्या लाटांसंदर्भात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने राज्यातील आपत्ती व्यवस्थापन विभाग, मदत पुनर्वसन आणि महसूल विभागाला मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. मार्च आणि एप्रिल महिन्यात येणाऱ्या उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याबाबतचे आदेश महसूल आणि वन विभागाने राज्यातील विविध विभागांना दिले आहेत.
शाळांना दिल्या विशेष सूचना
यात सकाळच्या सत्रातच परीक्षा घेण्यात याव्या असेही स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. विद्यार्थी, शिक्षकांना उष्णतेच्या लाटांच्या काळात काय उपाय करावे, याबाबत प्रशिक्षण देण्याचा पर्यायही केंद्राच्या विभागाकडून सुचवण्यात आला आहे.
याशिवाय प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये थंड वर्गखोल्या, प्रथमोपचार आणि पिण्याच्या पाण्याची सोय करावी, शाळेच्या वेळांमध्ये बदल करून उष्णतेच्या लाटेच्या परिस्थितीनुसार सुटी देण्यात यावी असे सांगितले आहे
उन्हाळ्यात विद्यार्थ्यांनी मैदानी आणि शारीरिक हालचाली टाळाव्या तसेच मैदानात वर्ग घेण्यात येऊ नये, दुपारच्या सत्रात मैदानावरील खेळांचे नियोजन करु नये, विद्यार्थ्यांना उष्णतेच्या लाटेपासून कसा बचाव करावा हे शिकवावे, आपत्कालीन सेवांचा संपर्क द्यावा, वर्गखोलीत पंखे सुस्थितीत राहतील याची खात्री करावी, माध्यान्ह भोजन योजनेंतर्गत मुलांना सरबत, ताक आणि ओआरएसचे पाकीट द्यावे, अशाही सूचना देण्यात आल्या आहे
Discussion about this post