लोकसभा निवडणुकीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा सुरु आहे. राज्यात महायुतीतील आमदारांनाही मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहे. अशातच राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली आहे. पुढील आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार केला जाण्याची शक्यता आहे. यावर काल रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दिल्लीतल्या बैठकीत याविषयी माहिती दिली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये काहीसं नाराजीचं वातावरण बघायला मिळत आहे. त्यामुळेच पावसाळी अधिवेशनाआधीच मंत्रिमंडळ विस्तार केला जावा, अशी मागणी आमदारांकडून होत असल्याचा अंदाज आहे. आता मंत्रिमंडळ विस्तार पावसाळी अधिवेशनाअगोदर २७ जून रोजी केला जाईल, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
या आमदारांची वर्णी लागणार?
संपूर्ण राज्याचं लक्ष या मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहे. या मंत्रिमंडळात कोणत्या आमदारांची वर्णी लागणार याकडे सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिदे गटातून आशिष जैस्वाल, यामिनी जाधव, संजय शिरसाट, भरत गोगावले, आणि लता सोनावणे यांच्या नावाची चर्चा आहे. तर अजित पवार गटाकडून अइंद्रनील नाईक, अण्णा बनसोडे, संग्राम जगताप आणि भाजपकडून आमदार नितेश राणे, मनीषा चौधरी, माधुरी मिसाळ, संजय कुटे,राणाजगजित सिंह पाटील, देवयानी फरांदे यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे.















Discussion about this post