मुंबई । राज्यातील अनेक ठिकाणी तापमानात वाढ झाल्याने उकाडा जाणवत आहे. सकाळी ९ वाजेपासूनच उन्हाचे चटके बसत आहे. उन्हाचा तडाखा आणखी वाढणार आहे. हवामान तज्ज्ञांनी राज्यातील मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात 9, 10 आणि 11 मार्च रोजी उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला आहे.
माजी हवामान अधिकारी कृष्णानंद होसाळीकर यांच्या मते, या कालावधीत मुंबई आणि कोकणातील काही भागांत उष्णतेच्या तीव्र लाटा जाणवतील. उन्हाचा प्रभाव जास्त असल्याने नागरिकांनी गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
7 मार्च रोजी मुंबईत कमाल तापमान 35.8 अंश सेल्सियस नोंदवले गेले. येत्या काही दिवसांत विशेषतः 12 मार्चपर्यंत, मुंबई महानगर क्षेत्रातील (MMR) तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे. पालघर, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण परिसरात 40 अंश तापमान नोंदवले जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.रविवार ते मंगळवारदरम्यान उन्हाचा प्रभाव जास्त जाणवेल, त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे हवामान विभागाने सांगितले आहे.
उष्णतेची लाट म्हणजे काय?
जेव्हा दिवसाचे कमाल तापमान 37 अंश सेल्सियसपेक्षा अधिक नोंदवले जाते आणि ते त्या दिवसाच्या सरासरी तापमानापेक्षा 4 अंशांनी अधिक असते, तेव्हा त्या परिस्थितीला ‘उष्णतेची लाट’ मानले जाते. कोकण विभागात गेल्या काही दिवसांपासून तापमान वाढत असून, पुढील आठवड्याच्या सुरुवातीपर्यंत ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
उर्वरित महाराष्ट्रात कोरडे हवामान
दक्षिण कोकणात, विशेषतः रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात, उष्ण आणि दमट हवामानामुळे नागरिकांना अस्वस्थता जाणवू शकते. रविवारी आणि सोमवारी सिंधुदुर्गातही दमट आणि गरम वातावरणाचा प्रभाव राहणार आहे. मात्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे या भागातील किमान तापमान 10 ते 12 अंश सेल्सियसपर्यंत खाली गेल्याची नोंद झाली आहे.
Discussion about this post