मुंबई । राज्याच्या हवामानात सध्या निसर्गाचा एक अनाकलनीय लपंडाव पाहायला मिळत आहे. कधी हुडहुडी भरवणारी थंडी, तर कधी अचानक दाटून येणारे काळे ढग अशा विचित्र स्थितीमुळे नागरिक पुरते गोंधळून गेले आहेत. आज राज्यात किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तापमानात होणारा सततच्या बदलावामुळे शेतकऱ्यांना आणि नागरिकांना त्याचा फटका बसत आहे.
जानेवारी महिना म्हणजे कडाक्याच्या थंडीचा काळ, मात्र यंदा चित्र काहीसे वेगळे आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींचा प्रभाव कमी असल्याने महाराष्ट्रात म्हणावा तसा गारठा अद्याप जाणवत नाहीये. यातच वातावरणात चढ उतार पाहायला मिळत आहे. काही दिवसांपासून थंडी गायब असून ठिकठिकाणी पावसासारखे वातावरण निर्माण झाले होते.
२७ जानेवारी जळगावसह राज्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे शेती पिकांचे मोठं नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला. या नुकसानाची भरपाई देण्यासाठी शेतकऱ्यांनी सरकारकडे मागणी केली आहे.
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, राज्यात आजही अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. थंडीचा कडाका वाढण्याऐवजी किमान तापमानात तीन ते चार अंशांनी वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर भारतात जरी पारा घसरलेला असला, तरी महाराष्ट्रात मात्र सध्या ‘मिक्स’ हवामान अनुभवायला मिळत आहे.
पहाटेच्या वेळी काही भागात दाट धुके आणि दवाचे थेंब पाहायला मिळत असले, तरी दुपारी मात्र उन्हाचा चटका जाणवत आहे. ही ‘कधी ऊन, कधी सावली’ अशी स्थिती आरोग्यासाठी आव्हानात्मक ठरत आहे.















Discussion about this post