लाखांदूर – लघुशंकेसाठी स्वच्छतागृहात गेलेल्या सहा वर्षीय विद्यार्थिनीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना पुयार येथे जि. प. वरिष्ठ प्राथमिक शाळेत घडली. यशस्वी सोपान राऊत असे मृत चिमुकलीचे नाव असून, नॅपकिन जाळण्याच्या मशीनच्या वायरमुळे ही घटना घडली असल्याचा संशय लाखांदूर पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी मुख्याध्यापकाला निलंबित करण्यात आले आहे.
यशस्वीने पुयार येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या पहिल्या वर्गात यंदाच प्रवेश घेतला होता. यशस्वी सकाळी दहा वाजता शाळेत आली. वर्ग सुरू होण्यास वेळ असल्याने शाळेच्या आवारात मुले-मुली खेळत होते. या दरम्यान यशस्वी स्वच्छतागृहात गेली. तिथे तिचा ॲल्युमिनियमच्या तारेला स्पर्श झाला. त्यात विद्युत प्रवाह आल्याने तिला जोरदार झटका लागून ती बेशुद्ध होऊन खाली पडली. याची इतर मुलींना माहिती झाल्यावर त्यांनी स्वच्छतागृहात जाऊन आधी तिला बाजूला केले. नंतर स्वयंपाक करणाऱ्या महिलांना याबाबत माहिती दिली.
काही वेळाने मुख्याध्यापक भावे घटनास्थळी आले. त्यानंतर जखमी यशस्वीला उपचारासाठी लाखांदूर येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.तेथे डॉ. दत्तात्रय ठाकरे यांनी यशस्वीला तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना देण्यात आली. ठाणेदार सचिन पवार, पोलिस उपनिरीक्षक दिनकर आगाशे व पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. शाळेतील स्वच्छतागृहात सॅनिटरी नॅपकिन जाळण्यासाठी मशीन लावली आहे. या मशीनला लावलेली अल्युमिनियमची तार लोंबकळत होत्या. त्यालाच मृत यशस्वीचा स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसला असावा, असा अंदाज पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.















Discussion about this post