मुंबई । राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालयातील विभागाचा कारकून राजेंद्र ढेरंगे याला ५० हजार रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे मंत्रालयात आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, मंत्री महोदयांचे खासगी सचिव रामदास गाडे यांच्या सांगण्यावरून पैसे मागितल्याचा दावा ढेरंगे याने चौकशीत केल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. अशातच आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवळ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले नरहरी झिरवळ?
काल आमच्या मंत्रालयातील एका क्लर्कला ट्रॅप करण्यात आलं. जो प्रकार घडला तो चुकीचा आहे. अनेकांनी आरोप केले की यात वरपर्यंत लिंक आहे. पण माझ्याशी त्याची लिंक जोडली गेली तर मी राजीनामा देईल, असं नरहरी झिरवळ यांनी स्पष्ट केलं आहे. मी एवढा मोठा नाही, की मला टार्गेट केलं जाईल, असं अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवळ यांनी म्हटलं आहे.
माझं कार्यालय बंद केलं नाहीये, कार्यालय चालू आहे. अशा प्रकारचं कृत्य होतं, ही जबाबदारी आहेच, नाही म्हणून चालणार नाही. त्याने जे कृत्य केलंय, त्याला आम्ही पाठीशी घालणार नाही, हे मी खात्रीने तुम्हाला सांगतो. या प्रकरणाची चौकशी व्हावी, असंही नरहरी झिरवळ यांनी म्हटलं आहे.
मुंबईत गेल्यानंतर मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेईन आणि या सर्व प्रकरणाविषयी त्यांच्यासोबत चर्चा नक्कीच करेन, पण जो गैरप्रकार झाला आहे, त्याला पाठीशी घातलं जाणार नाही. कायदेशीर बाब असेल तर त्याला जाब द्यावा लागेल. मंत्र्यांचे खासगी सचिव आणि विशेष कार्य अधिकारी यांच्याशी त्याच्या तसा थेट संबंध नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.















Discussion about this post