जळगाव | फेब्रुवारी–मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर, परीक्षा प्रक्रिया कॉपीमुक्त, भयमुक्त व शिस्तबद्ध वातावरणात पार पडावी, यासाठी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने आणि प्रामाणिकपणे परीक्षांना सामोरे जाण्याचे आवाहन केले आहे.
शिक्षणमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली २५ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीतील मार्गदर्शनानुसार राज्यात कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत असून, त्या अनुषंगाने जळगाव जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या संदेशात नमूद केले की, “विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी शिक्षण हा भक्कम पाया आहे. आगामी परीक्षांच्या काळात विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या दबावाशिवाय, निर्धास्तपणे व आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे. माझ्यासह जिल्हा प्रशासन विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे आहे. भयमुक्त व कॉपीमुक्त परीक्षा ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक घटकाची सामूहिक जबाबदारी आहे.”
शिक्षण हे केवळ गुण मिळविण्याचे साधन नसून, ते व्यक्तिमत्त्व घडविण्याची प्रक्रिया असल्याचे सांगून, विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवून प्रामाणिक प्रयत्नांतून यश संपादन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांना सकारात्मक व सुरक्षित वातावरण मिळावे, तसेच त्यांच्या मानसिक तयारीला योग्य दिशा मिळावी, यासाठी पालक व शिक्षकांनी मार्गदर्शन करावे, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले आहे.
आगामी परीक्षा कालावधीत जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी सज्ज असून, परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता व शिस्त अबाधित राहील, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्राची शैक्षणिक प्रतिमा अधिक सक्षम करण्यासाठी प्रामाणिक व न्याय्य मार्गाने शिक्षण व्यवस्थेला बळ देऊया, असे आवाहन करत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना आगामी परीक्षांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.















Discussion about this post