पुणे । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल येत्या २७ मे २०२४ रोजी लागणार आहे, अशी माहिती शिक्षण बोर्डाने दिली आहे. दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहता येईल, असंही बोर्डाने स्पष्ट केलं आहे.
महाराष्ट्र शिक्षण बोर्डाच्या mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या साईटवर जाऊन विद्यार्थी दहावीचा ऑनलाइन निकाल बघू शकतील. निकाल बघण्यासाठी विद्यार्थ्यांकडे हॉलतिकीट असणे आवश्यक आहे. परीक्षा क्रमांक टाकून विद्यार्थी ऑनलाइन निकाल पाहू शकतात.
यंदा दहावीची परीक्षा १ मार्च ते २६ मार्च २०२४ या कालावधीत घेण्यात आली होती.पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोकण आणि लातूर विभागातील जवळपास १६ लाख ९ हजार ४४४ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. विशेष बाब म्हणजे राज्यातील बऱ्याच परीक्षा केंद्रावर कॉपीमुक्त परीक्षा झाल्या होत्या.
विभागीय मंडळांकडून उत्तर पत्रिका तपासण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दहावीच्या निकालाची सर्वच विद्यार्थ्यांसह पालकांना उत्सुकता होती. दरम्यान दहावीचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Discussion about this post