पुणे । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याबाबत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. राज्य मंडळाने अर्ज भरण्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार, येत्या ७ ऑक्टोबरपासून म्हणजेच सोमवारपासून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. तर ५ नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे.
दहावीची परीक्षा देणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज सरल डेटाबेसवरून ऑनलाइन पद्धतीने शाळा प्रमुखांमार्फत भरून घेण्यात येणार आहेत. तसेच पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत आणि तुरळक विषय, आयटीआयचे (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी) विषय घेऊन प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे अर्ज ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने त्यांच्या शाळा प्रमुखांमार्फत भरण्यात येतील.
दहावीच्या परीक्षेसाठी नियमित शुल्कासह विद्यार्थ्यांचे अर्ज ५ नोव्हेंबरपर्यंत भरता येणार आहेत. सर्व माध्यमिक शाळांनी अर्ज भरण्यापूर्वी स्कूल प्रोफाइलमध्ये शाळा, संस्था, मान्यताप्राप्त विषय, शिक्षक याबाबतची योग्य माहिती भरून मंडळाकडे पाठविणे आवश्यक आहे. सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज भरून सबमिट केल्यानंतर अर्ज भरायच्या कालावधीमध्ये माध्यमिक शाळांच्या लॉगिनमधून प्री-लिस्ट उपलब्ध करून दिलेली असेल.
Discussion about this post