दिल्लीमध्ये झालेल्या भीषण स्फोटाची घटना ताजी असतानाच जम्मू-काश्मीरमध्ये देखील स्फोटाची भयंकर घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री दक्षिण श्रीनगरमधील नौगाम पोलिस स्टेशनमध्ये स्फोटाची ही घटना घडली. यात ९ जणांचा मृत्यू तर २९ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जप्त केलेली स्फोटकं हाताळताना पोलीस स्टेशनमध्ये हा अपघात घडल्याचे प्राथमिक वृत्त आहे. या घटनेची चौकशी सुरु असून दहशतवादी हल्ल्याची शक्यताही वर्तवली जात आहे..
मृतांमध्ये आणि जखमींमध्ये बहुतांश पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यातील काहींची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. स्फोटानंतर पोलीस ठाण्याचा परिसरातील अनेक वाहनांना आग लागली. मध्यरात्री झालेल्या या भीषण स्फोटानंतर रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्य सुरू केले.
पोलीस आणि फॉरेन्सिक टीम फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूल प्रकरणात जप्त केलेल्या स्फोटक साहित्याचे नमुने घेत होते, त्यावेळी हा स्फोट झाला. विशेष म्हणजे, ही स्फोटके हरियाणातील फरीदाबादमधून अटक केलेल्या डॉ. मुजम्मिल गनई याच्या भाड्याच्या घरातून हस्तगत करण्यात आली होती. प्राथमिक माहितीनुसार, नौगाम पोलीस स्टेशनमध्ये ३६० किलो स्फोटक रसायने आणि आयईडी बनवण्याचे साहित्य, ज्यात डेटोनेटर, तार आणि इतर घटक होते ते ठेवण्यात आले होते.
‘PAFF’ या जैश-ए-मोहम्मदशी संबंधित संघटनेने स्फोटाची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा केला आहे, मात्र अधिकारी या दाव्याची पडताळणी करत आहेत. सुरक्षा दलांनी स्निफर डॉग्सच्या मदतीने परिसर तपासला असून तो सील करण्यात आला आहे.















Discussion about this post