नांदेड शहरात गेल्या काही दिवसांत गुंडगिरीचा कहर वाढत असल्याचे चित्र समोर आले आहे. अवघ्या ४८ तासांत पाच खून झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ताज्या घटनेत श्रीनगर भागात दिवसाढवळ्या एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली.
मृत तरुणाचे नाव सोनू कल्याणकर (३५) असे असून तो शिंदेंच्या शिवसेनेचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळी सुमारे सहा वाजता तीन ते चार मारेकऱ्यांनी त्याला रस्त्यात गाठून शरीरावर अनेक वार केले. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, सोनू कल्याणकर याच्यावर तीन वर्षांपूर्वीही जीवघेणा हल्ला झाला होता. रींदा गँगचा सदस्य गोलू मंगनाळे याने त्याच्यावर गोळीबार केला होता. सध्या गोलू मंगनाळे तुरुंगात आहे. विशेष म्हणजे, शुक्रवारी रात्री गॅंगवॉरमधून तीन जणांचा खून झाला होता. त्यानंतर शनिवारी रात्री मुरमुरा गल्लीत रंजित सिंघ तबेलेवाले याची हत्या झाली आणि आज सकाळी पुन्हा एक खून झाल्याने अवघ्या ४८ तासांत पाच जणांचा जीव गेला आहे. या सलग घटनांमुळे नांदेड शहरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांसमोर गुन्हेगारी आटोक्यात आणण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.















Discussion about this post