धुळे : शिरपूर तालुका पोलीस पथकाने जंगलात लपवून ठेवलेला अंदाजे 70 लाख 70 हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणात भाईदास जगतसिंग पावरा आणि बाटा अमरसिंग पावरा या दोघांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी ती माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना दिली. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पार पाडून छाप्याचे नियोजन करण्यात आले. मिळालेल्या माहितीप्रमाणे भाईदास पावरा याने जंगलात खड्डा खोदून गांजाचा साठा लपवला होता, तर बाटा पावरा त्याची देखरेख करत होता.
पोलीस पथकाने सरकारी व खाजगी वाहनांच्या सहाय्याने सुळे गावातून लाकड्या हनुमान मार्गे रोहिणी शिवारात धाड टाकली. पोलिसांचे आगमन पाहून आरोपी पळून जाऊ लागले, मात्र त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर, बातमीदाराने दाखविलेल्या ठिकाणी पोलीस गेले असता नव्याने टाकलेली माती आढळून आली. अधिक चौकशीत दोघांनी गांजा लपवण्याची कबुली दिली.
जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम केल्यावर मातीखाली पत्र्याखाली ठेवलेल्या ३४ पत्रटी कोठ्यांमध्ये गांजाचा साठा सापडला. यामध्ये एकूण १,०१० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी चत्तरसिंग लखा खसावद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Discussion about this post