रामटेक : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये अजून जागावाटपचा तिढा सुटला नसून अशातच शिवसेना शिंदे गटाचा पहिला उमेदवार ठरला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामटेक मतदारसंघातून अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र यानंतर भाजपचे नेते आणि पदाधिकारी आक्रमक झाले आहेत.
आशिष जयस्वाल यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे हा रामटेक मतदारसंघ शिवसेनेच्या कोट्यात गेल्याचे निश्चित मानलं जातं असून आशिष जयस्वाल यांच्या उमेदवारीला भाजप नेते तसेच पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे. जर त्यांची उमेदवारी मागे न घेतल्यास आम्ही सामूहिक राजीनामे देऊ असा इशाराही पक्षश्रेष्ठींना दिला आहे.
त्यामुळे जागावाटपाआधीच महायुतीत वादाचे फटके फुटण्यास सुरुवात झाली आहे. आशिष जयस्वाल हे रामटेक विधानसभा मतदारसंघातून ४ वेळा निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी युतीधर्म न पाळता भाजपच्या उमेदवाराविरोधात बंड केलं होतं. यानंतर जयस्वाल यांनी ठाकरे सरकारच्या काळात महाविकास आघाडीला पाठिंबा देखील दिला होता.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर जयस्वाल यांनी शिंदे यांची साथ दिली होती. तेव्हापासून ते मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात होते. नुकताच सीएम एकनाथ शिंदे यांनी विदर्भाचा दौरा केला. यावेळी त्यांनी पारशिवणीमध्ये विकास कामाच्या भूमिपूजनही केले. यावेळी आशिष जयस्वाल यांनी शिवसेनेत अधिकृतपणे प्रवेश केला. त्यानंतर शिंदेंनी रामटेक मतदारसंघातून त्यांना उमेदवारी जाहीर केली.
दरम्यान, एकनाथ शिंदे जेव्हा उमेदवारी जाहीर करत होते. तेव्हा चंद्रशेखर बावनकुळे हे झोपले होते का? असा संतापही भाजप पदाधिकारी व्यक्त केला. आशिष जयस्वाल यांची उमेदवारी मागे न घेतल्यास येत्या १७ तारखेला आम्ही धडाधड राजीनामे देऊ, असंही भाजप पदाधिकारी म्हणाले.















Discussion about this post