मुंबई । पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणात मोठी घडामोड घडत असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का बसण्याची चिन्हे दिसत आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल सावंत यांनी पक्षाला अलविदा करण्याचा निर्णय घेतला असून ते लवकरच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. अनिल सावंत यांच्यासह ३ नेते शिंदेगटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे पंढरपुरमध्ये शिंदेगटाची ताकद वाढणार आहे.
पंढरपुरच्या नगराध्यक्षा प्रणिता भालके, भगीरथ भालके आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल सावंत हे शिवसेना शिंदेगटामध्ये प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ते शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेणार आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असलेल्या अनिल सावंत हे शिंदेगटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू होती. अखेर त्यांनी निर्णय घेतला असून ते उद्या म्हणजे १२ एप्रिल रोजी धनु्ष्यबाण हाती घेणार आहेत. पंढरपूर येथील टिळकस्मारक मैदानात शनिवारी दुपारी २ वाजता शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपुरमध्ये येणार आहेत.
त्यांच्याच उपस्थितीमध्ये अनिल सावंत यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. या मेळाव्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते उपस्थित राहणार आहेत. यावेळी तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आणि सरपंच यांच्यासह शेकडो कार्यकर्ते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती भगीरथ भालके यांनी दिली.















Discussion about this post