मुंबई । 2026 हे वर्ष राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे ठरणार असून, या वर्षात देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. याशिवाय, राज्यसभेतील ७१ खासदारांचा कार्यकाळही यंदा पूर्ण होत आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाराष्ट्रातील सात राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ पूर्ण होत असून ते निवृत्त होणार आहेत. देशभरात भाजपचे सर्वाधिक ३० खासदार यंदा राज्यसभेतून निवृत्त होत आहेत.
यंदा राज्यसभेतील एकूण ७१ खासदारांचा कार्यकाळ संपत आहे. त्यापैकी मार्च महिन्यात 1, एप्रिलमध्ये 37, जूनमध्ये 22 तर नोव्हेंबरमध्ये 11 खासदार निवृत्त होणार आहेत.
राज्यसभेच्या एकूण 245 जागांपैकी एप्रिल, जून आणि नोव्हेंबर 2026 या कालावधीत 73 जागांसाठी निवडणूक होणार आहे. निवृत्त होणाऱ्या खासदारांमध्ये केंद्रीय मंत्र्यांसह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. त्यातील सर्वात मोठे नाव म्हणजे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे. त्यांचा कार्यकाळ 25 जून 2026 रोजी संपणार आहे. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा हेही त्याच कालावधीत राज्यसभेतून निवृत्त होणार आहेत.
महाराष्ट्रातून कोण निवृत्त होणार?
महाराष्ट्रातील एकूण सात राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ 2 एप्रिल 2026 रोजी संपत आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे सर्वात मोठे नाव आहे. त्यांच्यासोबत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपचे माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड आणि खासदार धैर्यशील मोहन पाटील यांचाही समावेश आहे. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी, काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या खासदार डॉ. फौजिया खान हे सर्वजण एकाच दिवशी राज्यसभेतून निवृत्त होत आहेत.















Discussion about this post