मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या तुरुंगातील अनुभवांवर आधारित ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वादंग निर्माण केला आहे. या पुस्तकात त्यांनी राजकारणातील अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत. याच दरम्यान, संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खास पत्र लिहून पुस्तकाची एक प्रतही पाठवली आहे या पत्रात त्यांनी अप्रत्यक्षपणे सरकार, तपास यंत्रणा आणि सत्तांतरावर टीकास्त्र सोडलं आहे.
राऊत यांनी लिहिलेलं पत्र केवळ औपचारिक नव्हतं, तर त्यातून त्यांनी ‘ईडी’च्या राजकारणावर, शिवसेनेतील फूट आणि तुरुंगातील खडतर अनुभवांवर भाष्य करत एकनाथ शिंदेंना थेटपणे लक्ष्य केलं. “आपण या घटनांचा साक्षीदार आहात,” अशा शब्दांत त्यांनी शिंदेंना आठवण करून दिली. ‘ईडी-सीबीआय’च्या दबावाला झुकलो नाही, स्वाभिमान जपला – या पुस्तकातून ते समजेलच!, अशा शब्दांत राऊत यांनी आपल्या संघर्षाचा ठसा उमटवला.
हे पुस्तक 17 मे रोजी जावेद अख्तर, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रकाशित झालं असून, त्यामध्ये राऊत यांनी आजवर न उघड केलेल्या अनेक घडामोडींवर प्रकाश टाकला आहे. राज्याच्या राजकारणात या पुस्तकामुळे खळबळ माजली असून, एकनाथ शिंदे यांचा यावर काय प्रतिसाद येतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
पत्रात काय म्हणाले संजय राऊत?
श्री. एकनाथ शिंदे,
जय महाराष्ट्र!
‘नरकातील स्वर्ग’ या माझ्या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच पार पडले.
श्री. जावेद अख्तर, श्री. शरद पवार, श्री. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रकाशनाचा दिमाखदार सोहळा पार पडला. जुलमी व लोकशाही न मानणाऱ्या सरकारने मला एका खोट्या प्रकरणात 100 दिवसांसाठी तुरुंगात पाठवले. राजकीय विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा हा प्रकार अमानुष होता. ‘ईडी’सारख्या तपास यंत्रणांचा जुलूम सहन करून, संघर्ष करून मी संकटातून बाहेर पडलो. या संघर्षात माझ्या कुटुंबाची ससेहोलपट झाली. या प्रवासातील अनेक घटनांचे आपण एक साक्षीदार नक्कीच आहात. तुरुंगातील खडतर अनुभव आणि चिंतनातून या पुस्तकाची निर्मिती झाली. आपल्या अवलोकनार्थ पुस्तकाची प्रत पाठवत आहे. ‘ईडी’, ‘सीबीआय’ वगैरे भाजप पुरस्कृत तपास यंत्रणांच्या मनमानीस भीक न घालता स्वाभिमान टिकवता येतो हे या पुस्तकातून सांगण्याचा माझा प्रयत्न आपणास नक्कीच आवडेल !कळावे,
आपला नम्र,
(संजय राऊत)
Discussion about this post