जळगाव । शालेय शिक्षण विभागातर्फे राबवल्या जाणाऱ्या आरटीई प्रवेश प्रक्रियेला नव्याने सुरुवात होणार आहे. पालकांना पाल्याचा अर्ज आज शुक्रवारपासून ऑनलाइन भरता येणार आहे.
आरटीई प्रवेशासाठी जिल्ह्यातील २८२ इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील ३०१८ जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. यापूर्वी अर्ज भरलेल्या पालकांना आपल्या पाल्याचा अर्ज नव्याने भरावा लागणार आहे. राज्य शासनातर्फे आरटीई कायद्यात बदल करण्यात आला होता. त्यामुळे इंग्रजी शाळा आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर गेल्या होत्या.
मात्र शासनाने केलेल्या बदलाला न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर नव्याने प्रवेश प्रक्रिया राबवावी लागत आहे. आरटीई प्रवेशाच्या पोर्टलवर आरटीई पात्र असणाऱ्या शाळा व प्रवेशासाठी उपलब्ध जागांची जिल्हानिहाय माहिती प्रसिद्ध केलेली आहे.
Discussion about this post