जळगाव । वारकरी संप्रदायाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपचे तुषार भोसले यांच्यावर निशाणा साधताना त्यांनी “हा कोण नवीन तात्या विंचू मार्केटमध्ये आणलाय?” असा सवाल उपस्थित केला.
काय म्हणाल्या रोहिणी खडसे?
रोहिणी खडसे म्हणाल्या की, काही लोक वारकरी संप्रदायाचा आधार घेत समाजात द्वेष आणि फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वतःला ‘आचार्य’ म्हणवून घेणाऱ्यांना ही पदवी कोणी दिली, याचा तपास व्हायला हवा, अशी मागणी त्यांनी केली.
त्यांनी पुढे सांगितले की, शरद पवार यांनी याआधीही अशा “लबाड लांडग्यांवर” टीका केली आहे, जे वारकरी संप्रदायाचा आडोसा घेऊन समाजात तेढ निर्माण करतात. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना पूर्वी धमकी देण्यात आल्याचा उल्लेख करत त्यांनी या प्रवृत्तीवर कठोर कारवाईची गरज व्यक्त केली.
“वारकरी संप्रदायात द्वेषाला स्थान नाही. तरीही या नावाखाली कोणी समाजात तणाव निर्माण करत असेल, तर आम्ही मुक्ताबाई आणि बहिणाबाई चौधरी यांच्या विचारांचे वारसदार म्हणून त्याला रोखू,” असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, “भाजपने हा कोण नवीन ‘तात्या विंचू’ मार्केटमध्ये आणला आहे? जो स्वतःलाच ‘आचार्य’ म्हणवतो,” अशी टीका करत संबंधित व्यक्तीच्या पदवीबाबत चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.















Discussion about this post