मुंबई । मान्सूनच्या केरळातील आणि त्यानंतर महाराष्ट्रातील आगमनासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक असतानाच देशावर घोंगावणाऱ्या रेमल या चक्रिवादळानं टेन्शन वाढवलं आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 48 तासांमध्ये हे चक्रीवादळ बांगलादेशच्या किनारपट्टीवर धडकणार असून, त्यामुळं पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे.
रविवारपर्यंत या चक्रिवादळामुळं परिस्थिती आणखी बदललेली दिसेल. इथं महाराष्ट्रावर या वादळामुळं थेट परिणाम होणार नसल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. उलटपक्षी राज्याच्या विदर्भ आणि उत्तर मध्य महाराष्ट्र भागाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्राच्या काही भागांत अवकाळीचाही इशारा हवामान विभागानं दिला आहे.
आयएमडी आपल्या अंदाजात म्हटले आहे की, शनिवारी (ता.25) रात्रीपर्यंत रेमल चक्रीवादळ रौद्ररुप धारण करू शकते. हे चक्रीवादळ पश्चिम बंगालमधील सागर बेट आणि बांग्लादेश किनारपट्टीला धडकण्याची दाट शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे काही भागात वादळी वारे देखील वाहण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे.
‘या’ राज्यांना दक्षतेचा इशारा
इतकेच नाही तर रविवारी (ता.26) वाऱ्यांचा ताशी वेग 120 किमीपर्यंत पोहोचू शकतो. परिणामी, 26 आणि 27 मे रोजी पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशाच्या किनारपट्टी भागात तुफान पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. काही भागात अतिवृष्टीचा अंदाज आहे. रेमल चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल, उत्तर 24 आणि दक्षिण 24 परगणा, त्याचबरोबर पूर्व मिदनापूरच्या किनारी जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर उत्तर ओरिसा, बंगाल, त्रिपुरा, दक्षिण मणिपूर आणि मिझोराममध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे.
Discussion about this post