महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने प्रशासकीय कामाला गती देण्यासाठी आणि नियोजनाचा दर्जा सुधारण्यासाठी अर्थ व सांख्यिकी संचालनालयाबाबत दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. संचालनालयाच्या सुधारित आकृतिबंधास मान्यता देण्यात आली असून, आता १९०९ रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
आता या विभागाचे नाव बदलून अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय असे करण्यात आले आहे. मंजूर करण्यात आलेल्या १९०९ पदांमध्ये संचालनालयाची स्वतःची ९९६ पदे, जिल्हा नियोजन समित्यांची ५७६ पदे आणि इतर संबंधित विभागांमधील पदांचा समावेश आहे.
या नवीन रचनेमुळे नियोजन प्रक्रिया, मानव विकास कार्यक्रम आणि विविध विभागांच्या सांख्यिकी कामात अधिक सुसूत्रता येईल. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या या पदभरतीमुळे बेरोजगार तरुणांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे. मानव विकास कार्यक्रम, तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम आणि नक्षलग्रस्त विशेष कृती आराखडा कक्षातील काही पदांचे समायोजन करण्यात आले आहे.
कामकाजाचा आढावा घेऊन आणि मंजूर पदांची पुनर्रचना करून अर्थ व सांख्यिकी विभागाची कार्यक्षमता वाढवणे हा यामागील उद्देश असून, प्रशासकीय यंत्रणेवरील कामाचा ताणही कमी होण्यास मदत होईल, असे सांगितले जात आहे.















Discussion about this post