जळगाव । माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात उघडकीस आली आहे. आजीकडे गेलेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जळगावच्या एमआयडीसी पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत नराधम आरोपीला जेरबंद केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आपल्या आजीकडे राहण्यासाठी धरणगाव तालुक्यातील एका गावात गेली होती. ती घरात एकटी असल्याचे पाहून संशयित आरोपी तेजस गजानन हिरे याने जबरदस्तीने घरात प्रवेश केला. त्याने पीडितेवर अत्याचार केला.
पीडित मुलीने आरोपीचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने तिच्या तोंडाला कापड बांधून मारहाण केली आणि दहशत निर्माण करत तिच्यावर अत्याचार केला. घटनेनंतर आरोपीने पीडितेला व तिच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही समोर आले आहे.
घटनेनंतर पीडित मुलीने धैर्य दाखवत संपूर्ण प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ भारतीय दंड विधान आणि पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल करत आरोपीला अटक केली आहे.या संतापजनक घटनेमुळे धरणगाव परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.















Discussion about this post