मुंबई । राज्यात हिंदी भाषेचा वाद दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे याविरोधात एकत्र आले आहेत. दरम्यान, 19 वर्षांनंतर पहिल्यांदाच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्र जारी केले आहे. हे संयुक्त पत्र मराठी जनतेला उद्देशून लिहिले आहे. या पत्राद्वारे उद्धव आणि राज ठाकरे यांनी ५ जुलै रोजी होणाऱ्या जाहीर सभेला मराठी जनतेला आमंत्रित केले आहे.
संयुक्त पत्रात काय लिहिले आहे?
संयुक्त पत्रात लिहिले आहे,मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो नमवलं! कोणी नमवलं? तर तुम्ही – मराठी जनतेनं! आम्ही केवळ तुमच्या वतीने संघर्ष करत होतो.” “आता आनंद साजरा करण्याची वेळ आली आहे. आम्ही आयोजक आहोत, पण जल्लोष तुम्हालाच करायचा आहे. वाजत-गाजत, गुलाल उधळत या – आम्ही वाट बघतोय!”
सरकारच्या हिंदी सक्तीच्या राज्यभरातील विरोधानंतर दोन जीआर रद्द करण्यात आले. दरम्यान ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. यानंतर मराठी माणसाच्या विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याला दोन्ही ठाकरे बंधूंची उपस्थित महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे हा मेळावा केवळ विजयाचा जल्लोष आहे की भविष्यातील संयुक्त राजकीय समीकरणांची नांदी? याकडे आता अख्या महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे.
Discussion about this post