मुंबई । राज्यातील हवामानात फेब्रुवारीअखेर मोठे बदल जाणवत असून गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झालेली असतानाच अचानक अवकाळी संकटाचे ढग दाटले आहेत. काल राज्यातील अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वाऱ्यांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली.
काही ठिकाणी अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. या पावसाने शेतकऱ्यांसह नागरिकांची चिंता वाढवली आहे. आजही अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून पुढील दोन दिवस हवामान अस्थिर राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दक्षिण अंतर्गत कर्नाटकपासून मराठवाड्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे. आज धाराशिव, लातूर, नांदेड, सोलापूर, हिंगोली, गडचिरोली आणि चंद्रपूर या सात जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा विशेष इशारा देण्यात आला आहे. या भागांत अचानक वाऱ्याचा वेग वाढून मुसळधार सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.















Discussion about this post