मुंबई । राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत असून विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्याने मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहे. एकीकडे विधानसभेला तिसऱ्या आघाडीची स्थापना करुन बच्चू कडूंनी महायुतीला आव्हान दिले असतानाच आता त्यांच्याच प्रहार संघटनेमध्ये मोठी फूट पडली आहे.
प्रहार संघटनेचे एकमेव आमदार राजकुमार पटेल यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवड्यात राजकुमार पटेला यांचा पक्षप्रवेश होणार आहे. विधानसभेच्या तोंडावर एकनाथ शिंदेनी महायुतीसोबत असलेल्या बच्चू कडूंना हा सर्वात मोठा धक्का दिला आहे.
राजकुमार पटेल हे अमरावतीच्या मेळघाट विधानसभेचे आमदार आहेत. येत्या १० ऑक्टोबरला धारणी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजकुमार पटेल यांचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे राष्ट्रीय नेते माजी आमदार कॅप्टन अभिजीत अडसूळ यांनी याबाबतची माहिती दिली आहे. विधानसभेच्या तोंडावर एकुलत्या एका आमदारानेही साथ सोडल्याने बच्चू कडूंसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, यावरुन बोलताना बच्चू कडू यांनी महायुती सरकारसह एकनाथ शिंदेंना मोठा इशारा दिला आहे. ही भाजप सेनेची खेळी आहे, बच्चू कडूला कसं कमी करता येईल म्हणून त्यांनी हा प्रयत्न केलेला आहे. त्याचा पहिला प्रयत्न राजकुमार पटेल यांना तिकीट देऊन प्रहार कमजोर करण्याचा प्रयत्न आहे पण ते होणार नाही, वीस वर्षात कोणत्याही मोठ्या पक्षाचा पाठिंबा न घेत आम्ही आव्हान पेलले, काही लोक निवडणुकीला घाबरतात पण आम्ही निवडणुकीला घाबरवतो. आम्हाला जो शिंदे गटाने तोडण्याचा प्रयत्न केला आहे,त्याला आम्ही व्यवस्थित उत्तर देऊ,त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, असं ते म्हणालेत.
Discussion about this post