मुंबई । देशात मागील अनेक महिन्यापासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. अद्यापही महाराष्ट्रासह अनेक राज्यात पेट्रोलचा दर १०५ रुपयावर आहे. यातच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण होत आहे. कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्याने भारतात पेट्रोल डिझेलच्या किंमती घसरण्याची शक्यता होती. मात्र, अजूनपर्यंत पेट्रोल डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. मात्र यातच आता पेट्रोल डिझेलचे भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यामागील कारण म्हणजे इराणने इस्त्रायलवर शेकडो क्षेपणास्त्र डागली. त्यानंतर आशियामध्ये युद्ध होण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात एका दिवसात कच्च्या तेलाच्या किंमती ४ टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसात पेट्रोल डिझेलचे भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या वर्षभरात कच्च्या तेलाच्या किंमती २४ टक्क्यांनी घसरल्या आहेत. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला कच्चे तेल ६६ डॉलक प्रति बॅरलवर विकले जात आहे. त्यानंतर आता मंगळवारी पुन्हा ब्रेंट क्रूड ऑइल ७५.७९ डॉलरवर विकले जात आहेत.
कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने भारतातील पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढू शकतात.जर तेल १० डॉलरने महागले तर ०.३ टक्क्यांनी महागाईचा दर वाढतो. १ डॉलरने कच्च्या तेलाचे दर वाढले तर ५० ते ६० पैशांनी पेट्रोल डिझेलचे भाव वाढतात. तसेच कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या तर पेट्रोल डिझेलचे भाव कमी होतात. त्यामुळे आता पेट्रोल डिझेलचे भाव कमी होतील, याची शक्यता कमी आहे.















Discussion about this post