जळगाव । जळगावच्या धरणगाव तालुक्यातील पाळधी गावाजवळ एक भीषण अपघात घडला. या अपघातात आजोबांसह 6 वर्षीय नातवाचा जागीच मृत्यू झाला असून कुटुंबातील महिला गंभीर जखमी झाली आहे.
धरणगाव तालुक्यातील पाळधी गावाजवळील बायपासवरील कढोली फाट्याजवळ दुचाकी आणि भरधाव ट्रॅक्टर ट्रॉलीची जोरदार धडक झाली. या अपघातात देशमुख चुनीलाल राठोड आणि त्यांचा 6 वर्षांचा नातू परेश राठोड यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची पत्नी बेबीबाई राठोड या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, राठोड कुटुंब जळगाव येथे नुकत्याच खरेदी केलेल्या कारच्या कागदपत्रांच्या कामासाठी आले होते. काम आटोपून ते तिघे दुचाकीवरून आपल्या गावाकडे परतत असताना समोरून येणाऱ्या भरधाव ट्रॅक्टर ट्रॉलीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की आजोबा आणि नातू यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघातानंतर ट्रॉली चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून वाहनासह तो पाळधी पोलीस ठाण्यात ठेवण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच जळगाव जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.















Discussion about this post