नवी दिल्ली – एका न्यूज चॅनलच्या मुलाखतीत माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
तत्कालीन यूपीए सरकारवर मुंबई हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय दबाव आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या भूमिकेनंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणे टाळलं. माझ्या मनात या हल्ल्याचा बदला घेण्याचा विचार होता, परंतु सरकारने सैन्य कारवाई न करण्याचा निर्णय घेतला असं पी.चिदंबरम यांनी म्हटलं आहे.
२६ नोव्हेंबर २००८ साली लश्कर ए तैय्यबाचे १० दहशतवादी मुंबईत घुसले होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ओबेरॉय, ताज हॉटेल, कामा हॉस्पिटल यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ला केला. यात अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले. या हल्ल्याच्या जखमा आजही ताज्या असताना पी. चिदंबरम यांनी मोठा गौप्यस्फोट केल्याने खळबळ उडाली.
नेमकं काय म्हणाले पी. चिदंबरम?
पी. चिदंबरम म्हणाले की, मुंबईतील हल्ल्यानंतर काही दिवसांतच मी केंद्रीय गृहमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला होता. या हल्ल्यात १७५ हून अधिक लोकांचा जीव गेला होता. जगातील अनेक देशांतील अधिकाऱ्यांनी दिल्ली गाठत युद्ध सुरू करू नका असं म्हटलं होते. त्यावेळी कोंडोलीजा राइस ज्या तत्कालीन अमेरिकन परराष्ट्र मंत्री होत्या, त्यांनी माझी आणि पंतप्रधानांची भेट घेतली आणि प्रत्युत्तर देऊ नका असं सांगितले. मात्र हा निर्णय सरकार घेईल असं मी तेव्हा म्हटलं. आपल्याला बदला घ्यायला हवा असा विचार माझ्या मनात होता. त्यानंतर पुढे पंतप्रधान आणि इतर लोकांशीही संभाव्य कारवाईबाबत चर्चा केली होती असं त्यांनी म्हटलं.
तसेच जेव्हा हल्ला सुरू होता, तेव्हाही पंतप्रधानांनी त्यावर चर्चा केली होती. त्यानंतर जो निर्णय झाला त्यावर परराष्ट्र मंत्रालय आणि जागतिक संघटनांचा प्रभाव दिसून येत होता. या हल्ल्यावर कुठलीही सैन्य कारवाई नको अशी आठवणही पी.चिदंबरम यांनी सांगितली.















Discussion about this post