जळगाव । नवरात्रोत्सव तसेच जिल्ह्यातील विविध ठिकाणी होणारे बालाजी वहनोत्सव, रथोत्सव व पालखी मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील संबंधित ठिकाणचे आठवडी बाजार नियमित दिवशी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी रोहन घुगे यांनी दिले आहेत.
दिनांक ११ ते २३ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत नवरात्रोत्सव, तर ११ ते २६ ऑक्टोबरदरम्यान चोपडा, धरणगाव, पारोळा, भडगाव व मेहुणबारे येथे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या काळात दुर्गादेवी विसर्जन मिरवणुका, रथोत्सव व पालखी सोहळ्यांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई मार्केट अँड फेअर्स ॲक्ट, १८६२ च्या कलम ५ (अ) व ५ (क) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ११ ते २६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत चोपडा, धरणगाव, पारोळा, भडगाव, मेहुणबारे व जिल्ह्यातील इतर संबंधित ठिकाणचे आठवडी बाजार नियमित दिवशी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
संबंधित नगर परिषदा, नगर पंचायती व स्थानिक प्रशासनाने नागरिक आणि व्यापाऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी हे आठवडी बाजार नियमित दिवसाऐवजी दुसऱ्या किंवा सोईस्कर पुढील दिवशी भरविण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.















Discussion about this post