जळगाव । आधी दुष्काळाच्या झळा आणि आता अवकाळीची अवकळा यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्यात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यानुसार येत्या ४८ तासांत राज्यातील विविध ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता असून यामध्ये उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसासह गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्रातील जळगावसह धुळे, नंदुरबार, आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये देखील अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मराठवाड्यात अवकाळी पावसाचा अंदाज
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे. दुसरीकडे नागपूर विभागातही अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात २७ आणि २८ नोव्हेंबर रोजी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
त्यामुळे जिल्ह्यांना अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. अकोला आणि बुलढाण्यात देखील आज आणि उद्या विजांच्या कडकडाटासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी शेतपिकांची काळजी घ्यावी, असं आवाहन हवामान खात्याने केलं आहे. दुसरीकडे मुंबईसह पुणे विभागाला अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातही पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. मुंबईत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर ठाण्यालाही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.















Discussion about this post