मुंबई । राज्यात एकीकडे थंडीची चाहूल लागली असून यातच अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज सकाळपासून अनेक जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यातच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील ३ तासांत जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
या जिल्ह्यांना पावसाचा इशारा
पुणे, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये पुढील ३ तासांत जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
या वर्षी उशिरा सुरु झालेल्या पावसाने शेतकऱ्याची चिंता वाढवली होती. मात्र पाऊस जरी उशिरा सुरु झाला असलातरी प्रमाणात पडल्याने भातशेतीची पिके चांगली आली होती. परंतु आज दुपारी अचानक सुरु झालेल्या पावसाने पोलादपुर, महाड, माणगाव, म्हसळा, रोहा, सुधागड तालुक्यांना चांगलेच झोडपलेय.
अचानक आलेल्या या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर सर्वात मोठा फटका येथील शेतकऱ्याला बसलाय. भाताचे पिक तयार झाले असून अनेक ठिकाणी कापलेले भाताचे पिक शेतात वाळवण्यासाठी ठेवलेले आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे भात पिकाचे मोठे नुकसान झाले असून येथील शेतकरी हवालदिल झाला आहे.
बुधवारी पहाटेपासूनच कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू झालाय . हातकणंगले तालुक्यातील घुणकी या गावात मुसळधार पाऊस पडल्याने संपूर्ण गाव तसेच शेतांमध्ये पाणीच पाणी झालेय. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्येही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार, आज पहाटेपासूनच कोल्हापूर जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली.















Discussion about this post