जळगाव | जळगाव शहरात सोमवारी दुपारी झालेल्या भीषण रस्ते अपघातात लग्नाला अवघे सहा दिवस झालेल्या नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाला. माहेरी जाण्यासाठी काकांसोबत दुचाकीवरून निघालेल्या २१ वर्षीय वैशाली भाऊसाहेब पाटील यांना भरधाव चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. या अपघातात त्यांचे काका गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मृत विवाहितेचे नाव वैशाली भाऊसाहेब पाटील (वय २१, रा. कोळपिंप्री, ता. अमळनेर) असे आहे. वैशाली यांचा विवाह ७ जुलै रोजी जळगावातील देवराम नगर (गुजरात पेट्रोल पंप परिसर) येथील पोलीस कर्मचारी विजय काशिनाथ पाटील यांच्याशी मोठ्या उत्साहात पार पडला होता. विवाहानंतर नवदांपत्याने देवदर्शन करून काही दिवसांपूर्वीच घरी परतले होते.
सोमवारी वैशाली यांना माहेरी घेऊन जाण्यासाठी त्यांचे काका सासरी आले होते. दुपारचे जेवण झाल्यानंतर दोघे दुचाकीवरून कोळपिंप्रीकडे रवाना झाले. दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास जळगाव विद्यापीठासमोरील रस्त्यावरून जात असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या एका चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघेही रस्त्यावर फेकले गेले.
अपघातात वैशाली यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ मदत करत दोघांनाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर वैशाली यांना मृत घोषित केले. त्यांच्या काकांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
लग्नानंतर अवघ्या सहाव्याच दिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली आहे. रुग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला असून परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. धडक देणाऱ्या चारचाकी वाहनाचा शोध सुरू असून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.














Discussion about this post