जळगाव । देशातील पर्यटन वाढावे, देशातील शहारांची कनेक्टीव्हिटी वाढावी यासाठी रेल्वे सुविधा आणल्या जात आहेत. आता महाराष्ट्रातील नाशिक ते थेट दार्जिलिंग अशी रेल्वे सेवा सुरु होणार आहे. त्यामुळे नाशिक आणि जळगावरून तुम्ही थेट दार्जिलिंग गाठू शकणार आहात. पूर्व भारताशी (उत्तर बंगाल) उत्तर महाराष्ट्राला जोडणारी नवीन अलिपूरद्वार-मुंबई (पनवेल) अमृत भारत एक्स्प्रेस साप्ताहिक सुरू झालीय.
ट्रेनचं वेळापत्रक कसं असेल
अलिपूरद्वार-मुंबई (पनवेल) अमृत भारत एक्सप्रेस अलिपूरद्वार येथून गुरुवारी सकाळी ४:४५ वाजता सुटेल. ही ट्रेन पनवेल येथे शनिवारी सायंकाळी ५:३० वाजता पोहोचेल. पनवेल-अलिपूरद्वार अमृत भारत एक्सप्रेस पनवेल येथून सोमवारी सकाळी ११:५० वाजता सुटेल आणि बुधवारी दुपारी १:५० वाजता अलिपूरद्वार गाठेल.
दरम्यान ही अमृत ट्रेन महाराष्ट्रात कल्याण, नाशिकरोड, जळगाव आणि भुसावळ या ठिकाणी थांबेल. हा मार्ग अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळांनाही जोडणारा आहे. यात चहाच्या मळ्यांसाठी आणि हिमालयीन दृश्यांसाठी प्रसिद्ध असलेलं दार्जिलिंग, एक प्राचीन बौद्ध शिक्षण केंद्र असलेले विक्रमशिला महाविहार, बिहार सर्किटवर जवळच असलेले महाबोधी मंदिर, देशातील सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेला त्रिवेणी संगम, रामायणाशी संबंधित असलेले चित्रकूट धाम आणि भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर भेट घडणार आहे.
म्हणजेच काय ज्या लोकांना चहाचे मळे बघायचे आहेत, आणि ज्यांना त्र्यंबकेश्वरचं दर्शन घ्यायचं आहे, त्या लोकांसाठी ही अमृत भारत एक्सप्रेस भारी असणार आहे. दरम्यान या रेल्वेमुळे पर्यटनाला चालना मिळेल. महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांना अमृत भारत ट्रेनचा फायदा होणार आहे.















Discussion about this post