मुंबई । राज्याच्या राजकारणातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पक्षाकडून १० अधिकृत प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर करण्यात आली आहे. राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर माध्यमांसमोर पक्षाची भूमिका मांडण्याची जबाबदारी या प्रवक्त्यांवर असणार आहे.
कोअर कमिटीच्या बैठकीनंतर मोठा निर्णय
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक आज पार पडली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील, अनिल देशमुख, हर्षवर्धन पाटील, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके, माजी खासदार फौजियाताई खान, राजेंद्र शिंगणे आणि माजी आमदार ॲड. अशोकबापू पवार यांच्यासह पक्षातील प्रमुख नेते उपस्थित होते. बैठकीनंतर पक्षाने नव्या प्रवक्त्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
या १० नेत्यांवर प्रवक्तेपदाची जबाबदारी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नव्या प्रवक्त्यांमध्ये जितेंद्र आव्हाड, क्लाईड क्रास्टो, भीमराव हत्तीअंबीरे, अनिश गवांदे, ॲड. फैजल मिर्झा, महेबूब इब्राहीम शेख, प्रवीण कुंटे पाटील, प्रशांत सोनबा वीरकर, ॲड. हेमाताई पिंपळे आणि डॉ. चंद्रकांत बारेला यांचा समावेश आहे. या सर्व प्रवक्त्यांकडून पक्षाची अधिकृत भूमिका माध्यमांसमोर मांडली जाणार असून, राज्यातील तसेच राष्ट्रीय पातळीवरील राजकीय घडामोडींवर पक्षाची भूमिका स्पष्ट करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल.
यापूर्वीच्या नियुक्त्या केल्या होत्या रद्द
दरम्यान, ऑगस्टच्या सुरुवातीला पक्षाने यापूर्वी नियुक्त केलेल्या प्रवक्त्यांच्या सर्व नियुक्त्या रद्द केल्या होत्या. ४ ऑगस्ट २०२६ पासून पुढील आदेशापर्यंत या नियुक्त्या तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात येत असल्याचे पक्षाकडून जाहीर करण्यात आले होते.त्या काळात माजी आमदार विद्या चव्हाण आणि महेश तपासे हे पक्षाचे अधिकृत प्रवक्ते म्हणून माध्यमांसमोर पक्षाची भूमिका मांडणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. आता कोअर कमिटीच्या बैठकीनंतर पक्षाने नव्याने १० प्रवक्त्यांची घोषणा केली आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी शरद पवार गटाची माध्यमांमधील भूमिका अधिक आक्रमकपणे मांडली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.














Discussion about this post