नाशिक । नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदांवरून महायुती सरकारमध्ये वाद सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. या दोन्ही जिल्ह्यातील पालकमंत्रिपदावरून भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये वाद सुरू होता.यातच आता नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटल्याची माहिती समोर आली आहे.
नाशिकचे पालकमंत्रिपद भाजपकडेच देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकचा पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला आता रायगडचे पालकमंत्रिपद कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नाशिकचे पालकमंत्रीपद गिरीश महाजनांकडेच देण्यात आले असून आता रायगडचा तिढा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी एकत्र बसून सोडवा, असे दिल्लीतील वरिष्ठांकडून सांगण्यात आले आहे.
नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती
नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर 18 जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री पदाची घोषणा केली. मात्र दुसऱ्याच दिवशी नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिली. या स्थगितीमुळे शिंदे गटाचे नेते नाराज असल्याचे बोललं जात होतं.
यानंतर भाजपने नाशिकच्या पालकमंत्रिपदावर दावा कायम ठेवला होता. अशामध्ये आता नाशिकचे पालकमंत्रिपद हे गिरीश महाजन यांच्याकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन वर्षांनंतर सिंहस्थ कुंभमेळा नाशिकमध्ये होणार असल्याने या कुंभमेळ्याच्या सर्व तयारीसाठी भाजप पालकमंत्रिपद आपल्याकडे कायम ठेवणार असल्याचे म्हटले जात आहे.
Discussion about this post