नंदूरबार । जिल्ह्यातील मलोनी परिसरामधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. ज्यात गांजाच्या नशेत धूर्त असलेल्या एका व्यक्तीने २३ वर्षीय महिलेवर किरकोळ वादातून चाकू हल्ला केला. यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिपाली चित्ते असं मृत महिलेचं नाव आहे. दरम्यान, दिपालीच्या मृत्यूनंतर नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी समाजात तीव्र संतापाची लाट संपूर्ण जिल्ह्यात उमटताना पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना निवेदन देण्यात येत आहेत.
शहादा तालुक्यातील लोणखेडा गावात पतीसोबत राहणारी दिपाली चित्ते (वय २३) ही आपल्या आईचं घर असलेल्या मलोनी भागात भेटायला गेली होती. ती घरात आईसोबत असतानाच शेजारी राहणारा रिज्जु मुस्लिम कुरेशी नावाचा व्यक्ती आणि त्याची पत्नी गेल्या काही दिवसांपासून दिपालीची आई आणि तिच्या लहान बहिणीसोबत सतत भांडण करत होते. दरम्यान २९ डिसेंबरला दिपाली आईजवळ असताना शेजऱ्यांसोबत पुन्हा भांडण सुरू झाले. यात गांजाच्या नशेत असलेल्या रिज्जू कुरेशी हा अश्लील भाषेत शिवीगाळ करू लागला.
जाब विचारण्यासाठी दिपाली गेली असता कुरेशी याने तिच्यावर चाकू हल्ला केला. या चाकू हल्ल्यात दिपाली गंभीररीत्या जखमी झाली. त्यानंतर तिच्या पतीने तिला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र शहादा शहरात योग्यरीत्या उपचार न झाल्याने तिला गुजरात राज्यातील सुरत येथे उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान दिपालीचा मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
याप्रकरणी शहादा पोलिसांत हमीद कुरेशी, रिज्जु मुस्लीम कुरेशी, विधी संघर्ष बालिका (सर्व. रा अक्सा पार्क समोर मलोणी ता. शहादा) याच्या विरोधात गुन्हा नोंदविला होता. पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता दोन्ही आरोपींना जामीन मंजूर केला होता. दोन्ही आरोपींना न्यायालयाने जामीन दिल्यानंतर या विरोधात आदिवासी संघटनातर्फे मलोणी येथे आंदोलन केले. उपविभागीय पोलीस अधीक्षक दत्ता पवार, पोलीस निरीक्षक निलेश देसले यांना कठोर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले होते.















Discussion about this post