नंदुरबार । राज्यात लाचखोरीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असून अशातच लाखोंचा पगार असलेल्या नंदुरबार च्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यास गुगल पे द्वारे ३०० रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. या कारवाईने खळबळ उडाली.
तक्रारदाराच्या गायीचा मृत्यू झाला होता. गाईचा विमा असल्याने शवविच्छेदन करणे गरजेचे होते. शवविच्छेदन करून देण्याच्या मोबदल्यात विसरवाडीचे पशुवैद्यकीय अधिकारी (वर्ग १) हर्षल गोपाळ पाटील (वय २९) याने तक्रारदाराकडून शासकीय फीचे १५० रुपये गुगल पे द्वारे घेतले. यानंतर पुन्हा तक्रारदाराकडून ४०० रुपये लाचेची पंचांसमक्ष मागणी केली. तडजोडीअंती ३०० रुपये लाचेची मागणी केली.
१२ फेब्रुवारी २०२५ रोजी गुगल पे द्वारे ३०० रुपये लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केलेल्या तक्रारीवरून पथकाने कारवाई केली आहे. हर्षल पाटील यास पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले. तसेच उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पर्यवेक्षण अधिकारी तथा पोलिस उपअधीक्षक राकेश चौधरी, पोलिस निरीक्षक नेहा सूर्यवंशी, आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
Discussion about this post