मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मनसेचा एकही उमेदवार या निवडणुकीत नसणार आहे. राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. दरम्यान, राज ठाकरे यांनी एमआयजी क्लबमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय का घेतला? यासंदर्भातील कारण राज ठाकरे यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत अनेक महत्वाचे विषय मार्गी लागले आहे. त्यात राम मंदिराचा विषय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते तर राम मंदिर झालेच नसते, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळे आणखी पाच वर्ष त्यांना संधी द्यावी, असे आपणास आणि पक्षाला वाटले, यामुळे मनसेने महायुतीला पाठिंबा दिल्याचे स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी केले.
दरम्यान, राज ठाकरे यांनी मोदींना पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला आहे. मात्र, मोदींसाठी राज ठाकरे सभा घेणार की नाही? कार्यकर्त्यांनी प्रचारात जायचं की नाही? जायचं तर कुणी जायचं? प्रचारातील मनसेची भूमिका काय असेल? आदी मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. त्यामुळे राज ठाकरे मोदींसाठी महायुतीच्या व्यासपीठावर जाऊन निर्णय घेणार की नाही? याबाबतचा निर्णय आज होऊ शकतो. त्यामुळेच या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.