बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) ने २०२७-२८ या भरती प्रक्रियेसाठी प्रोबेशनरी ऑफिसर (PO/MT) आणि स्पेशलिस्ट ऑफिसर (SO) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. देशभरातील विविध सरकारी बँकांमध्ये एकूण ७,४६० पदे भरली जाणार असून, इच्छुक उमेदवारांना २१ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
या भरतीमध्ये प्रोबेशनरी ऑफिसरच्या ६,७१५ जागा असून त्यामध्ये बँक ऑफ बडोदा (१,९००), कॅनरा बँक (१,५००), बँक ऑफ महाराष्ट्र (१,१००), इंडियन ओव्हरसीज बँक (५५०), पंजाब नॅशनल बँक (५०४), बँक ऑफ इंडिया (५००), सेंट्रल बँक ऑफ इंडिया (५००) आणि पंजाब अँड सिंध बँक (१६१) या बँकांचा समावेश आहे.
याशिवाय स्पेशलिस्ट ऑफिसरच्या ७४५ जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये आयटी ऑफिसर (३०९), कृषी क्षेत्र अधिकारी (१९०), लॉ ऑफिसर (१०५), पर्सोनल/एचआर ऑफिसर (८९), राजभाषा अधिकारी (५२) आणि मार्केटिंग ऑफिसर (६०) या पदांचा समावेश आहे.
प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे, तर स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी संबंधित क्षेत्रातील चार वर्षांची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे. उमेदवारांचे वय २० ते ३० वर्षे असावे. अर्ज शुल्क ८५० रुपये निश्चित करण्यात आले आहे.
भरती प्रक्रियेत प्रथम ऑगस्टमध्ये पूर्वपरीक्षा, त्यानंतर ऑक्टोबरमध्ये पीओ मुख्य परीक्षा आणि नोव्हेंबरमध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर मुख्य परीक्षा होणार आहे. पूर्व आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखत नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात घेतली जाईल.
पीओ पूर्वपरीक्षा १०० गुणांची असून इंग्रजी, रीझनिंग आणि क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड या विषयांचा समावेश असेल. मुख्य परीक्षा २२५ गुणांची राहणार असून त्यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्नांसह वर्णनात्मक (डिस्क्रिप्टिव्ह) पेपरचाही समावेश असेल. स्पेशलिस्ट ऑफिसरसाठी स्वतंत्र परीक्षा पद्धत निश्चित करण्यात आली आहे.
इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी ऑनलाइन अर्ज करून परीक्षेची तयारी सुरू करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी IBPS च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.















Discussion about this post