ठाणे : ठाण्यातील शिवसेना (शिंदे गट) महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख आणि माजी महापौर मीनाक्षी राजेंद्र शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप (बाळू) पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावरून मीनाक्षी शिंदे यांच्यावर आरोप होत असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ठाण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
‘माझ्यामुळे पक्षाची बदनामी होऊ नये’
मीनाक्षी शिंदे यांनी राजीनामा पत्रातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर तसेच पक्षपातळीवर आपल्याविरोधात विविध आरोप केले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सर्वपक्षीय नेते एकत्र येऊन एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव निर्माण करण्याचे षडयंत्र आखत असल्याचा आरोपही त्यांनी पत्रात केला आहे.
ज्या प्रकरणांशी आपला कोणताही संबंध नाही, अशा प्रकरणांमध्ये आपले नाव जोडून पक्ष आणि नेतृत्वावर दबाव आणला जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आपल्यामुळे पक्षाची किंवा पक्षनेतृत्वाची बदनामी होणे सहन होणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. आपला राजीनामा कोणत्याही नाराजीतून दिलेला नसून, पक्षाची प्रतिष्ठा जपण्यासाठी आणि पक्षनेतृत्वाप्रती आपली निष्ठा कायम असल्याचे दाखवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे मीनाक्षी शिंदे यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.















Discussion about this post