जळगाव । ममुराबादजवळील पेट्रोलपंपासमोर दुचाकी आणि पॅजो रिक्षाची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार प्रौढाचा जागीच मृत्यू झाला. विजय पंडीत कोळी (वय ४५, रा. पार्वती ओक नगर) असे मृत व्यक्तीने नाव असून याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत असे की , शहरातील पार्वतीबाई ओक नगरात विजय कोळी हे कुटुंबियांसह वास्तव्यास होते. शनिवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास विजय कोळी हे (एमएच १९ एवाय ७९०५) क्रमांकाच्या दुचाकीने विदगावहून जळगावकडे जाण्यासाठी निघाले. तर ममुराबाद येथून (एमएच १९ व्ही ३६४२) क्रमांकाची पॅजो रिक्षा मजूरांना घेवून यावलकडे जात होती. ममुराबादजवळील फार्मसी कॉलेजवळील पेट्रोलपंपासमोर दुचाकी आणि पॅजो रिक्षाची समोरासमोर धडक झाली.
या अपघातात दुचाकीस्वार विजय कोळी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळतच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक माणिक सपकाळे व पोहेकॉ विलास शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी विजय कोळी यांना नागरिकांच्या मदतीने एका वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांची तपासणी करीत मयत घोषीत केले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, मुलगा, भाऊ , पुतणे असा परिवार आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दुचाकीसह पॅजो रिक्षाच्या धडकेत विजय कोळी यांचा मृत्यू झाल्याची बातमी कळताच त्यांच्या नातेवाईकांसह मित्रमंडळींनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
Discussion about this post