सांगली । महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच सांगलीतून एक महत्त्वाची राजकीय बातमी समोर आली आहे. पुणे पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अरुण लाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या महायुतीच्या मेळाव्याला हजेरी लावली. त्यांच्या या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, अरुण लाड भाजपमध्ये प्रवेश करणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
राज्यात विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक होत आहे. नागपूर पदवीधर, मराठवाडा पदवीधर, पुणे पदवीधर, पुणे शिक्षक आणि अमरावती शिक्षक या मतदारसंघांचा त्यात समावेश आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रचाराला वेग आला आहे. काही मतदारसंघांत उमेदवारीवरून बंडखोरी, तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचे चित्र पाहायला मिळत आहे.
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महायुतीचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अरुण लाड उपस्थित होते. महायुतीच्या नेत्यांसोबत त्यांची उपस्थिती दिसल्याने राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे.
अरुण लाड यांचे पुत्र शरद लाड यांनी यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता पुत्रानंतर अरुण लाडदेखील भाजपमध्ये प्रवेश करणार का, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र, अरुण लाड यांच्या भाजप प्रवेशाबाबत अधिकृत घोषणा झाल्याची माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीवरून सुरू झालेल्या चर्चांना अद्याप दुजोरा मिळालेला नाही.
पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीची मैत्रीपूर्ण लढत
दुसरीकडे, पुणे शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीवरून महायुतीमध्येही वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. या जागेवर भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाने दावा केला होता. मात्र, जागावाटपात पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले सचिन सानप यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे या मतदारसंघात महायुतीतील भाजप आणि शिवसेना यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे चित्र आहे.















Discussion about this post