पुणे | महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून असलेल्या विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची मतमोजणी आज, मंगळवारी (२७ ऑक्टोबर) होत आहे. शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) पार पडलेल्या मतदानानंतर आता पाच मतदारसंघांतील निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत महायुती बाजी मारणार की महाविकास आघाडीला यश मिळणार, याचे चित्र निकालानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान,पुणे पदवीधर विधान परिषद मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर मतपेट्यांच्या सीलवरून वाद निर्माण झाला आहे.
मतमोजणी प्रक्रियेदरम्यान सात ते आठ मतपेट्यांचे सील तुटलेले असल्याचा दावा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांच्या प्रतिनिधीने केला आहे. या प्रकारावर आक्षेप घेत संबंधित मतपेट्या बाजूला ठेवून पारदर्शकपणे मतमोजणी करण्याची मागणी करण्यात आली. या मुद्द्यावरून निवडणूक अधिकारी आणि उमेदवाराच्या प्रतिनिधीमध्ये वादावादी झाल्याची माहिती समोर आली आहे.
सात ते आठ मतपेट्यांचे सील तुटल्याचा दावा
पुणे पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी बालेवाडी येथे सुरू असताना हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. हर्षदा देशमुख-जाधव यांच्या प्रतिनिधीने मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेत सात ते आठ मतपेट्यांचे सील तुटलेले असल्याचा दावा केला. प्रतिनिधीच्या म्हणण्यानुसार, या प्रकाराची माहिती अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली; मात्र मतमोजणी पुढे सुरू ठेवण्यास सांगितल्याचा आरोप प्रतिनिधीने केला.सील तुटलेल्या मतपेट्यांमधील मतदान नेमके कोणाच्या बाजूने झाले आहे, हे सांगता येत नाही. त्यामुळे या मतपेट्यांबाबत स्पष्टता आवश्यक असल्याचे प्रतिनिधीने म्हटले आहे.
मतपेट्यांचे सील तुटलेले असणे ही गंभीर बाब असल्याचे सांगत संबंधित मतपेट्या बाजूला ठेवून मतमोजणी करावी, अशी मागणी हर्षदा देशमुख-जाधव यांच्या प्रतिनिधीने केली आहे. मतमोजणी प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडावी आणि या प्रकरणाची योग्य दखल घेतली जावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. दरम्यान, मतपेट्यांचे सील नेमक्या कोणत्या परिस्थितीत तुटले, याबाबत अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नाही. तसेच या आक्षेपावर निवडणूक प्रशासनाने कोणती कार्यवाही केली, याचीही अधिकृत माहिती स्पष्ट होणे बाकी आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपच्या डॉ. स्मिता योगेश जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हर्षदा देशमुख-जाधव यांच्यात प्रमुख लढत आहे. ठाकरे गटाकडून सुनील मोदी निवडणुकीच्या रिंगणात आहेत.या निवडणुकीत ६२.७८ टक्के मतदानाची नोंद झाली. त्यानंतर आता मतमोजणी सुरू असून, कोणाच्या बाजूने मतदारांचा कौल लागतो, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघाचा निकाल राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. भाजपच्या उमेदवाराला विजय मिळणार की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निकालामुळे राज्यातील राजकीय समीकरणांबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे.















Discussion about this post