मुंबई । महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात अलिकडच्या काळात अनेक बदल घडत आहेत. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला झालेल्या पराभवानंतर, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्व निवडणुकांसाठी लागू होणार आहे, असे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
संजय राऊत यांचे वक्तव्य
“नागपूरपासून मुंबईपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार आहोत. एकदा आम्हाला पाहायचं आहे, जे काही होईल ते होईल, आमचं असं ठरतंय,” असे संजय राऊत म्हणाले. त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या महत्त्वावर भर दिला. “मुंबई, ठाणे, नागपूरमध्ये कार्यकर्त्यांना संधी केव्हा देणार? कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे पक्ष वाढीला फटका बसतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका सर्व पक्षांनी स्वबळावर लढवाव्या आणि आपापल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी,” असे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले.
राजकीय वातावरण
विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील तणाव वाढला आहे. शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातील मतभेद तीव्र झाले आहेत. या पार्श्वभूमीवर, उद्धव ठाकरे यांनी मातोश्री येथे विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, विधानसभा संघटक यांच्यासोबत अनेक बैठका घेतल्या आहेत. या बैठकीत अनेक पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसशी युती न करता स्वबळावर निवडणूक लढवण्याची मागणी केली आहे.
फडणवीस यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया
देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. “कोण कुठे जाणार, कोण कुठे येणार हे आमचे मित्र देवेंद्र फडणवीस ठरवणार नाहीत. प्रत्येक पक्षाची एक भूमिका आयडिओलॉजी असते. तुम्ही आमच्या पक्षाला तोडले आहे, ते कुठल्या आयडिओलॉजीमध्ये बसते? जर राजकीय तुरुंगात टाकण्याची परंपरा तुम्ही सोडणार असाल तर आम्ही तुमचे स्वागत करू,” असे त्यांनी म्हटले.
राजकीय संबंध
संजय राऊत यांनी यावेळी भाजप आणि शिवसेनेच्या पूर्वीच्या संबंधांवरही प्रकाश पाडला. “कोणी कायमचा शत्रू आणि मित्र नसतोच. आम्ही 25 वर्ष मित्रच होतो.. आम्ही भाजपचे सर्वात विश्वासपात्र मित्र होतो.. मात्र आता मित्र राहिलो नाही. महाराष्ट्रात अनेक दिग्गज नेते राहिले त्यांनी कधी सुडाचे राजकारण केले नाही.. सेंट्रल एजेंसी चा वापर करून विरोधकांना तुरुंगवास भोगायला लावला नाही,” असे ते म्हणाले.
Discussion about this post