मुंबई । राज्यात फेब्रुवारीपासूनच तापमानात वाढ झाल्यामुळे उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. अचानक तापमान वाढल्याने दुपारी अंगाची लाहीलाही होत आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ३५ अंशावर गेला असून पुणे येथील हवामान विभाग तज्ज्ञ सुदीप कुमार यांनी अचानक झालेल्या तापमान वाढीचे कारण सांगितले आहे.
तापमान वाढीचे कारण
हवामान विभाग तज्ज्ञ सुदीप कुमार यांनी सांगितले की, राज्यात पुढील दोन दिवस 34 ते 35 अंश सेल्सियस तापमान असणार आहे. तापमानातील ही वाढ उत्तर भारतामध्ये झालेल्या हवामान बदलामुळे झाली आहे. पुढील दोन दिवस उन्हाचा तडाखा राज्यात राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. साधारणपणे एक ते दोन अंश सेल्सियसने कमाल आणि किमान तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
दिवसा ऊन, रात्री थंडी
राज्यात सध्या दिवसा कडक ऊन जाणवत आहे, तर रात्री थंडी वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना विचित्र वातावरणाचा सामना करावा लागत आहे. साधारणपणे मार्च महिन्यात होळीनंतर तापमान वाढ होत असते, परंतु यंदा फेब्रुवारीच्या मध्यामध्ये वाढलेले तापमान हे उत्तर भारतातील हवामान बदलामुळे आहे. हे वाढलेले तापमान साधारणपणे दोन-तीन दिवस असणार आहे. गेल्या 24 तासांत सोलापूर, सांगली, परभणी, विदर्भातील ब्रह्मपुरी, अकोला, नागपूर, चंद्रपूर, वर्धा या भागातील तापमान 36 अंशांवर गेले.
Discussion about this post