पुणे | राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्यानंतर आता राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसाने उसंती घेतली आहे. मागील दोन, तीन दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. मात्र राज्यातील काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. यात जळगाव जिल्ह्यात सकाळपासून मध्यम पाऊस कोसळत आहे.
हवामान खात्याने राज्यात ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस असल्याचा अंदाज वर्तविला आहे. दरम्यान, आज रविवारी राज्यातील कोणत्याही जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट दिला नाही. परंतु पुणे, सातारा, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, बुलढाणा या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोकण विभाग सोडल्यास ८ ऑगस्टपर्यंत राज्यात पाऊस असणार आहे. तर कोकणात १० ऑगस्टपर्यंत पाऊस असेल. त्यानंतर त्याचा जोर कमी होईल.
खान्देशात जोरदार पाऊस नाहीच
खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. परंतु धुळे जिल्ह्याच्या सीमावरती भागामध्ये चांगला पाऊस झाला आहे. यामुळे पांजरा नदीवर बांधण्यात आलेल्या धरणांमधील पाणीसाठा वाढला आहे. जामखेली धरणापाठोपाठ लाटीपाडा धरण 100 टक्के भरले आहे. अक्कलपाडा धरणामध्ये पाण्याचा साठा वाढत आहे.
जळगाव जिल्ह्यामधील काही ठिकाणी शनिवारी (६ऑगस्ट) सायंकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. २० ते अर्धा मिनिट पावसाने हजेरी लावली. आज रविवारी सकाळपासून जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाची रिपरिप सुरूच होती.
Discussion about this post