मुंबई । गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा फटका बसत आहे. या पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले असून बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. यातून सावरण्याचे प्रयत्न सर्व स्थरातून केले जात असताना दुसरीकडं हवामान खात्यानं धडकी भरवणारा अंदाज वर्तवला आहे.
राज्यात आठवडाअखेर पावसाचा जोर राज्यात पुन्हा एकदा वाढणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार असल्याने मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील 6 दिवस मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडून पुढील दोन दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी कऱण्यात आला आहे, तर 26 आणि 27 तारखेला कोकणाला पावसाचा ऑरेन्ज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यादरम्यान 30-40 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असून संभाव्य धोका लक्ष्यात घेता नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
शेतकऱ्यांचं न भरून निघणारं नुकसान
नवरात्रीच्या सुरुवातीपासूनच राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या 24 तासांमध्ये बीडमधील पाटोदा येथे 150 मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर अहिल्यानगर, सोलापूर, जळगाव, धाराशिव आणि संभाजीनगर येथेही जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे लाखो एकरवरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.
जिल्हानिहाय पावसाचा अंदाज (24 ते 29 सप्टेंबर 2025)
24 सप्टेंबर: पावसाची तीव्रता किंचित कमी होईल, पण पूर्व विदर्भात मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.
25 सप्टेंबर: नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
26-27 सप्टेंबर: पुणे, रायगड, सातारा, बीड, सोलापूर, लातूर, नांदेड आणि इतर जिल्ह्यांमध्ये अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी 150 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो.
28 सप्टेंबर: मुंबई, ठाणे, कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.















Discussion about this post